पूरबाधित भागांतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन नुकसानीचा अहवाल सादर करावा, चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

57

पुणे : शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आज केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत,असे निर्देश मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरबाधित भागात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. तसेच या भागांतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मोहोळ म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पूरबाधित क्षेत्रातील स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पूरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. याकरिता पुरेसे मनुष्यबळ वाढवावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत.

बैठकीस उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणीसाठा, विसर्गाबाबत वेळोवेळी अद्ययावत सूचना, पूरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करुन बाधित नागरिकांना मदत, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, नदीपात्रातील भराव काढणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील,  जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.