‘हर घर तिरंगा’ अभियान: पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची आढावा बैठक संपन्न
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या अभियानाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मंडलांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, सूक्ष्म नियोजन करणे आणि व्यापक जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवला जावा आणि स्वातंत्र्याचा अमृत संदेश समाजातील अंतिम घटकापर्यंत म्हणजेच प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि मंडल स्तरावर अभियानाचे चोख नियोजन करणे. समाजातील सर्व घटकांना, सामाजिक संस्थांना आणि नागरिकांना या राष्ट्रोत्सवात उत्स्फूर्तपणे सामील करून घेणे. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्याचा अमृत संदेश घराघरांपर्यंत पोहोचवणे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
या प्रसंगी आमदार योगेश सागर, निरंजन डावखरे, उमाताई खापरे, अमित गोरखे, राहुल कुल, राहुल आवाडे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, मनोज घोरपडे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.