मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनापूर्वी महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनींच्या बॅंक खात्यात पैसे जमा करुन महायुती सरकारने आपला शब्द पूर्ण केला – चंद्रकांत पाटील

24

पुणे : महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारने आजपर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे.‌ मग तो मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असो किंवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनापूर्वी महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनींच्या बॅंक खात्यात पैसे जमा करुन महायुती सरकारने आपला शब्द पूर्ण केला आहे. यावेळी विविध भागातून आलेल्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून अतिशय आनंद वाटला, असे पाटील म्हणाले. यावेळी काही भगिनीनी आणलेल्या राखी बांधून आपला आनंद व्यक्त केला.

महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.