कर्णबधिर मुलांसाठी सर्वतोपरी मदत करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : कॉक्लिआ संस्थेच्या माध्यमातून एम.बी. नांबियार यांच्या फोटोग्राफी प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन संस्थेसमोरच्या समस्या सोडवण्याचे आणि कर्णबधिर मुलांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वस्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा एखादा असा विषय समोर येतो; जो एक वेगळाच अनुभव देऊन जातो. किंवा समाजातील एक वेगळा संघर्षमय प्रवास समोर येतो, जो स्तिमित करुन जातो. असाच एक अनुभव आज घेतला. तो म्हणजे कर्णबधिर मुलांच्या जीवन संघर्षाचा. गरीब आणि गरजू कर्णबधिर मुलांवर उपचारासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे या फोटो प्रदर्शनाला जेव्हा भेट दिली; तेव्हा कर्ण बधिरतेने ग्रस्त असलेल्यांचा तसेच यावर यशस्वीपणे मात केलेल्यांचा संघर्ष ऐकून अचंबित झालो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पाटील यांनी कर्णबधिरांना मदत करण्याचे काम अतिशय पुण्याचे असल्याने, संस्थेसमोरच्या समस्या सोडवण्याचे आणि कर्णबधिर मुलांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वस्त केले.
यावेळी शैलेंद्र देवळाणकर, डॉ. अविनाश वाचासुंदर, रक्षा देशपांडे, गौरवी वांबुरकर, दिलीप कोटीभास्कर आदी उपस्थित होते.