कोथरुडमधील १,७०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण
पुणे : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ‘पुनर्निमाण सोशल फाऊंडेशन’च्या वतीने एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. फाऊंडेशनच्या वतीने कोथरुडमधील तब्बल १,७०० विद्यार्थ्यांना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या सोहळ्यादरम्यान बोलताना पाटील यांनी , कोथरुडमधील सेवा कार्याची ही परंपरा सातत्याने पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, समाजातील प्रत्येक सक्षम कुटुंबाने आपल्या क्षमतेनुसार किमान चार गरजू व्यक्तींना शक्य ती मदत केली, तर समाजात खूप मोठे आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे कोथरुडमधील शेकडो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा हातभार लाभला असून, फाऊंडेशनच्या या सामाजिक दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास नगरसेविका मनिषा बुटाला, ज्योत्स्ना कुलकर्णी, रेश्मा बराटे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गिरीश भेलके, विशाल रामदासी, रणजीत हरपुडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.