कात्रज इस्कॉन मंदिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्रीकृष्णाचे दर्शन; “सुख, शांती, समृद्धी नांदो” म्हणत राज्यातील जनतेसाठी मागितले साकडे!
पुणे : पुण्यातील कात्रज येथील प्रसिद्ध इस्कॉन (ISKCON) मंदिरात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे मनोभावे दर्शन घेऊन राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.
सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थनादर्शन घेतल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. “भगवान श्रीकृष्णांच्या प्रेम, करुणा आणि धर्मनिष्ठेचा संदेश आपल्या जीवनाला सदैव मार्गदर्शक ठरो. त्यांच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांनी केवळ दर्शनच घेतले नाही, तर मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या भोग आणि भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या महाप्रसाद बनविण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेत प्रसादाचा आनंद लुटला. यासोबतच त्यांनी मंदिर परिसरातील गोशाळेला भेट देऊन गोमातेचे दर्शन व पूजन करत आशीर्वाद घेतले. या सोहळ्याला पुण्यातील हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.