पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले सपत्नीक दर्शन
पुणे : गणेशोत्सवाच्या अत्यंत उत्साही आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे आराध्य दैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले. १५ सप्टेंबर रोजी कसबा गणपती मंदिरात उपस्थित राहून त्यांनी बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा केली.

“वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा॥” या पवित्र श्लोकाच्या उच्चारात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या अखंड जयघोषात हा संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. बाप्पाच्या दर्शनाने मन अत्यंत प्रसन्न आणि भक्तिभावाने भरून आल्याची भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, विघ्नहर्त्या गणरायाची कृपादृष्टी प्रत्येक नागरिकावर आणि भक्तावर सदैव राहो; सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना त्यांनी लाडक्या गणरायाच्या चरणी मनोभावे केली.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवा निमित्त कसबा पेठ परिसरासह संपूर्ण पुण्यात भक्तीचा आणि उत्साहाचा पूर आला आहे.