रा. स्व. संघाचे माजी जिल्हा संघचालक स्व. अशोकराव तेलंग यांच्या हरिपूर येथील निवासस्थानी जाऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
सांगली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सांगली माजी जिल्हा संघचालक अशोकराव तेलंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशोकरावांच्या हरिपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या भेटीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेलंग कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अशोकरावांच्या जाण्याने संघ परिवारातील एक अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते आपण गमावले आहेत. अशोकराव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तेलंग कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
अशोकराव तेलंग यांनी आपल्या प्रदीर्घ प्रवासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सांगली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवले. त्यांच्या निधनाने संघ परिवाराने एक निष्ठावान, समर्पित आणि अत्यंत तळमळीचा ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या प्रसंगी भाजप आणि संघ परिवारातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अशोकरावांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.