पुण्यात जिव्हाळा फाउंडेशनतर्फे ‘छंद विठ्ठलाचा’ भक्ती सोहळा संपन्न; शेतमजुरांच्या लेकींना शिक्षणाची संधी देणाऱ्या उपक्रमाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

8

पुणे : पुणे येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने “छंद विठ्ठलाचा” या विठ्ठल भक्तीच्या सुरेल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक उपस्थित राहत सोहळ्याचा आनंद घेतला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पाटील म्हणाले, जिव्हाळा फाऊंडेशन समाजातील शेतमजूरांच्या लेकींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे, ही अत्यंत प्रेरणादायी आणि समाजाभिमुख सेवा आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करत असून, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ असलेले डॉ. अमोघ जोशी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्येतही त्यांनी संगीताचा छंद जपला असून, त्यांच्या सुमधुर आवाजातील विठ्ठल भक्तिगीते ऐकताना मन भक्तिरसात न्हाऊन निघाले. याच प्रसंगी त्यांच्या “कालस्वर” या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला अंजली पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, ॲड. शर्वरी मुठे, राजेंद्र मुठे, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. डॉ. शारंगधर साठे, डॉ. संगीत पारनेरकर, डॉ. अमोघ जोशी, सुषमा जोशी, प्रवीण बढेकर, अमर मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.