वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार न आणता तो खर्च गरजूंच्या मदतीसाठी करावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्नेही व हितचिंतकांना नम्र आवाहन

6

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा येत्या १० जून रोजी वाढदिवस असून, त्यानिमित्ताने त्यांनी सर्व स्नेही, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना एक अत्यंत संवेदनशील आणि समाजोपयोगी आवाहन केले आहे. “माझ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार, शाल, श्रीफळ किंवा मिठाई आणण्याऐवजी, त्यासाठी होणारा खर्च समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी किंवा विविध सेवा उपक्रमांसाठी करावा. तीच माझ्यासाठी सर्वांत मौल्यवान भेट आणि खरी शुभेच्छा ठरेल,” असे नम्र आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरवर्षी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हितचिंतक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यावर्षी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तो पैसा समाजकार्यासाठी सत्कारणी लावावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पुष्पगुच्छ किंवा महागड्या वस्तू काही काळापुरत्याच मर्यादित राहतात, त्याऐवजी तोच निधी एखाद्या गरीब, गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, रुग्णाच्या उपचारासाठी किंवा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी वापरल्यास अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, सर्व हितचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिले आहेत. वाढदिवसाचा हा क्षण केवळ वैयक्तिक कौतुकाचा न ठरता सामाजिक कृतज्ञतेचा ठरावा, हाच या आवाहनामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी या आवाहनाचा आदर करावा आणि १० जून रोजी कोणत्याही स्वरूपाचे हार, शाल किंवा भेटवस्तू न आणता, सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये योगदान देऊन शुभेच्छा द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.