मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वस्ती भागात आरोग्य शिबिर; ‘निरोगी समाज हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सूर्य प्रभा नर्सिंग होम आणि सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने वस्ती भागातील नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन स्वतः मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शिबिरातील वैद्यकीय सुविधांची पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला.
उद्घाटनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. समाजाच्या आणि विशेषतः वस्ती भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे असे सेवाभावी उपक्रम खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे औचित्य सार्थ ठरवतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच या शिबिरासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
वाढदिवसाच्या बडेजावाला फाटा देऊन राबवण्यात आलेल्या या आरोग्य चळवळीबद्दल बोलताना मंत्री पाटील भावुक झाले. एक निरोगी समाज निर्माण होणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आणि अनमोल वाढदिवसाची भेट आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शिबिराच्या माध्यमातून वस्ती भागातील शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधे व वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
यावेळी सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील, सूर्य प्रभा नर्सिंग होमचे जितेंद्र आग्रवाल, नगरसेविका अर्चना पाटील, तनिषा पाटील, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, भाजप पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, माजी नगरसेविका छाया मारणे, स्वाती मोहोळ आदी उपस्थित होते.