पुण्यात गुरुपौर्णिमेनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री दत्तप्रभू व सद्गुरू श्री शंकर महाराजांचे दर्शन; पालखी सोहळ्यात लाभला ‘भोई’ होण्याचा मान

8

पुणे : गुरुपौर्णिमेच्या शुभ आणि मंगलमय मुहूर्तावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यनगरीतील प्रमुख श्रद्धास्थानांना भेटी देऊन दर्शन घेतले. त्यांनी पुण्यातील ऐतिहासिक श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर आणि सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन महापूजा व आरती केली, तसेच राज्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवार पेठेतील श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टच्या मंदिरात जाऊन विश्वगुरू श्री दत्तात्रेयांचे अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले आणि पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी श्री दत्तप्रभूंच्या पवित्र चरणी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या चौफेर प्रगतीसाठी, समाजात सद्भावना, शांती, समृद्धी नांदण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.

त्यानंतर त्यांनी धनकवडी येथील पुण्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन दर्शन घेतले आणि महाराजांच्या समाधी चरणी नतमस्तक झाले. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सद्बुद्धी नांदो, अशी प्रार्थना त्यांनी महाराजांच्या चरणी केली. यंदाच्या गुरुपौर्णिमेला मंत्री चंद्रकांत पाटील यांना एक विशेष अध्यात्मिक बहुमान मिळाला. मठात आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत पवित्र अशा श्री शंकर महाराजांच्या पालखी सोहळ्यात त्यांना स्वतः खांदा देऊन ‘भोई’ होण्याचा मान पाटील यांना लाभला. यासोबतच, दर्शनासाठी मठात आलेल्या हजारो भाविकांची त्यांनी महाप्रसाद वाटपाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सेवा केली.

याविषयी आपले भावोद्गार व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तप्रभूंचे दर्शन आणि सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या पालखीला खांदा देण्याचे भाग्य मिळणे, तसेच भाविकांची प्रसाद सेवा करायला मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. गुरुकृपेची ही पवित्र अनुभूती मला आयुष्यभर लोकसेवेची प्रेरणा देणारी ठरेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.