‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले दर्शन

6

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असून, गुरुवारी विठ्ठल नामाचा गजर आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात उत्साहात आगमन झाले. टाळ-मृदुंगाचा नाद आणि अश्वांच्या दौडीने मंदिर परिसर आणि पुण्याचे रस्ते भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आणि भाविकांनी पुणे शहरात मोठी गर्दी केली होती.

पुणे येथे मुक्कामी असलेल्या दोन्ही संतांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादूकांवर नतमस्तक होत मनोभावे पूजा व दर्शन घेतले.

दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेणे हा एक अलौकिक अनुभव आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेवर, बळीराजावर आणि कष्टकऱ्यांवर विठुरायाची व माऊलींची कृपा सदैव राहो. राज्यात सुख, समृद्धी आणि शांतता नांदू दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी विठ्ठल चरणी केली.

पालख्यांच्या मुक्कामादरम्यान पुणे प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात अहोरात्र चालणाऱ्या भजनांमुळे कोथरूड आणि संपूर्ण पुणे शहरात एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा पाहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.