पुणे शहरातील ४ मतदारसंघांची भाजपची ‘एसआयआर’ बैठक संपन्न; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

11

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने देशभर राबवल्या जाणाऱ्या ‘एसआयआर’ (SIR – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण) मोहिमेच्या अनुषंगाने आज पुणे शहरातील वडगाव शेरी, पुणे कॅन्टोनमेंट, हडपसर आणि खडकवासला या चार प्रमुख मतदारसंघांतील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय सहकार व नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने बूथ पातळीवर सक्रिय सहभाग नोंदवावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या कार्यक्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये आढळणाऱ्या दुबार नावांच्या किंवा इतर तांत्रिक त्रुटींची सखोल पडताळणी करून, त्या तातडीने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. तसेच, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या उच्चस्तरीय बैठकीला भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, संबंधित मतदारसंघांचे आमदार, माजी नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.