सासवड-जेजुरी रस्त्यावर वारीतील ट्रकच्या धडकेत सांगलीच्या ३ महिला वारकऱ्यांचा भीषण अपघातात मृत्यू; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त

8

पुणे : पुण्यातील सासवड-जेजुरी रस्त्यावर वारी दरम्यान एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. वारीमध्ये सहभागी झालेल्या एका अनियंत्रित ट्रकने जोरदार धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेल्या तिन्ही महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील रहिवासी होत्या. आषाढी वारीच्या भक्तीमय प्रवासात असताना घडलेल्या या अपघाताबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यातील सासवड-जेजुरी रोडवर झालेल्या दुर्दैवी अपघातात सांगली येथील ३ महिला वारकऱ्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या माऊलींवर काळाने झडप घालावी हे मन हेलावून टाकणारे आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारकरी महिलांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. तसेच या अपघातात जे वारकरी बांधव जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी माऊली विठ्ठलचरणी प्रार्थना करतो.

मंत्री पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. वारीतील ट्रकने दिलेल्या या धडकेच्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, संपूर्ण वारी मार्गावर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व कडक उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जात आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.