मतदार यादीत नाव नोंदवा, मतदानाचा अधिकार सुरक्षित करा! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : “लोकशाहीमध्ये आपल्याला आपला नेता आणि राजा निवडण्याचा सर्वोच्च अधिकार मतदानामुळे मिळतो. हाच लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी सध्या राज्यात सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे’ (SIR) अंतर्गत मतदार यादी शुद्धीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ३० जुलैपूर्वी आपल्या घरी येणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) अधिकाऱ्यांच्या मदतीने आपले फॉर्म नक्की भरून घ्या आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्या,” असे जाहीर आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
दर २० वर्षांनी होणारे शुद्धीकरण का गरजेचे?
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मतदार यादीचे असे सखोल शुद्धीकरण साधारणपणे दर २० वर्षांनी केले जाते. काळाच्या ओघात मतदार यादीत अनेक बदल आणि त्रुटी निर्माण होतात. अनेक मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवली जातात. मृत व्यक्तींची नावे यादीत तशीच राहतात. स्थलांतरामुळे अनेक मतदारांचे पत्ते बदलतात. या सर्व त्रुटी दूर करून एक पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे.
या मोहिमेअंतर्गत दोन फॉर्म भरून घेतले जात आहेत. यातील एक फॉर्म पडताळणीसाठी मतदाराकडे स्वतःकडे राहील आणि दुसरा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा केला जाईल. नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथ) एका विशेष सरकारी अधिकाऱ्याची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जुलै रोजी फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर मतदार यादीची एक ‘कच्ची यादी’ (Draft Roll) प्रसिद्ध केली जाईल. या कच्च्या यादीत जर आपले नाव सुटले असेल, तर नागरिकांना त्यावर अपील करण्याची संधी मिळेल. आपले नाव मतदार यादीत असणे आणि ते अचूक असणे हे प्रत्येक जागृत नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अजिबात उशीर न करता, त्वरित आपल्या बूथ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे फॉर्म भरून घ्यावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.