गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये युवा वाद्य पथक ट्रस्टचा भव्य वाद्यपूजन सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, पुण्यनगरीतील ढोल-ताशा पथकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, पुणे येथे वंदे मातरम् संघटना कृत युवा वाद्य पथक ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक वाद्यपूजन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या शुभहस्ते ढोल-ताशा आणि झांजांचे विधिवत वाद्यपूजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आगामी गणेशोत्सवासाठी पथकातील सर्व वादक तरुण-तरुणींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

वाद्यपूजनानंतर पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या ढोल-ताशांच्या जोरदार वादनाने संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साही वातावरणाने दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याप्रसंगी बोलताना आणि युवा वादकांना संबोधित करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गणेशोत्सव आणि ढोल-ताशा पथक ही आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची खरी ओळख आहे. ही समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम तरुण मंडळी करत आहेत, याचा आनंद आहे. मात्र, ही परंपरा जपत असतानाच ‘वंदे मातरम् संघटना’ सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वस्ती पातळीवरील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी जे मोलाचे कार्य करत आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे.
या प्रसंगी उद्योजक पुनीत बालन, प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे, वंदे मातरम् संघटनेचे सचिन जामगे, गणेश देशपांडे, अनिश पाडेकर यांच्यासह वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.