पुण्यात ‘शिवसाम्राज्य वाद्य पथक ट्रस्ट’चा वाद्यपूजन सोहळा संपन्न; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः ढोल वाजवून केला वादन सरावाचा शुभारंभ

9

पुणे : आगामी गणेशोत्सवाचे वेध संपूर्ण महाराष्ट्राला लागले असून पुण्यनगरीतील ढोल-ताशा पथकांच्या वादन सरावाला आता उत्साहात सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, पुणे येथे ‘शिवसाम्राज्य वाद्य पथक ट्रस्ट’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक वाद्यपूजन सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत वाद्यांचे विधिवत पूजन केले. विशेष म्हणजे, मंत्री पाटील यांनी स्वतः ढोल अंगावर चढवून ढोल-ताशा वादन सरावाचा उत्साहात शुभारंभ केला आणि सर्व वादक युवक-युवतींना आगामी गणेशोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ उपस्थिती न लावता, पथकातील तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी स्वतः काही काळ ढोल वादकांसोबत ढोल वाजवला. तसेच, पथकाच्या अत्यंत शिस्तबद्ध अशा ध्वज पथकाचे सदस्य होत ध्वज फडकवण्याचाही एक अविस्मरणीय क्षण अनुभवला.

आपला हा भक्तीमय अनुभव व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गणेशोत्सव आणि आपल्या ढोल-ताशा पथकांची संस्कृती ही महाराष्ट्राच्या अथांग उत्साहाला संस्कार, शिस्त आणि परंपरेची जोड देणारी एक अमूल्य ओळख आहे. शिवसाम्राज्य पथकातील या उत्साही युवक-युवतींचा जोश, त्यांचे पथकाप्रती असलेले समर्पण आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेले अथांग प्रेम पाहून माझं मन खऱ्या अर्थाने आनंदाने भरून आलं आहे.

याप्रसंगी उद्योजक पुनीत बालन, ढोल-ताशा महासंघाचे पराग ठाकूर, नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, तेजश्री पवळे, नगरसेवक सुनील पांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे, भाजपा नेते महेश पवळे, मंदार बलकवडे, नितीन पंडित, सलील सावरकर, राजाभाऊ बलकवडे यांच्यासह वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.