कोथरूडमध्ये मराठी भावसंगीताच्या सुवर्णकाळाचा प्रत्यय! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रंगली ‘त्रिवेणी’ सांगीतिक मैफल

6

पुणे : मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरसम्राट सुधीर फडके (बाबूजी), ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि सुप्रसिद्ध संगीतकार-गायक श्रीधर फडके या त्रयींच्या अजरामर गीतांच्या आठवणींनी आणि सुरेल गप्पांनी कोथरूडमध्ये एक अनोखी सांगीतिक मैफल रंगली. कोथरूड येथे रेडिफाइन्झ कल्चर क्लबच्या वतीने आयोजित ‘त्रिवेणी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून या सुरेल सोहळ्याचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांची प्रामुख्याने लाभलेली उपस्थिती. त्यांनी स्वतः बाबूजी (सुधीर फडके) आणि आशाताई भोसले यांच्यासोबत काम करतानाचे अनेक हृद्य अनुभव, कौटुंबिक आठवणी आणि पडद्यामागील रंजक किस्से रसिकांसमोर उलगडले. त्यांच्या या मनोगतातून मराठी भावसंगीताच्या वैभवशाली सुवर्णकाळाचा जणू पुन्हा एकदा सुंदर प्रत्यय आला. या सोहळ्यात कलाकारांनी बाबूजी, आशाताई आणि श्रीधरजी यांच्या अनेक लोकप्रिय अजरामर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या सांगीतिक प्रवासाबद्दल आपले भावोद्गार व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “‘त्रिवेणी’ हा कार्यक्रम केवळ गाण्यांची एक मैफल नव्हता, तर तो आपल्या समृद्ध सांगीतिक परंपरेचा आणि मराठी सांस्कृतिक वारशाचा खऱ्या अर्थाने एक भव्य उत्सव होता. कोथरूडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा हा सुंदर सोहळा उपस्थित प्रत्येक संगीत रसिकाच्या मनात कायमची गोड आठवण बनून राहील.”

Get real time updates directly on you device, subscribe now.