‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नामदार करंडक’साठी बक्षिसांची मोठी घोषणा

6

पुणे : कोथरूडमधील नवोदित आणि हौशी कलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘नामदार करंडक’ आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत  पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अत्यंत दिमाखात सांगता झाली.

कोथरूडच्या स्थानिक सोसायट्यांमधील कलाकारांच्या स्वप्नांना बळ देणारा हा उपक्रम सांस्कृतिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरत आहे.या चौथ्या पर्वातील विजेत्या आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा गौरव महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे आणि लोकप्रिय अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या विशेष उपस्थितीत पुरस्कार देऊन करण्यात आला. या दिग्गज कलाकारांच्या हस्ते सन्मानित होणे हा नवोदित कलावंतांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला.

सहभागाचा आलेख आणि पुढील वर्षी ५० सोसायट्यांचे लक्ष्य:‘नामदार करंडक’चा कोथरूडकरांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद हीच या उपक्रमाची खरी ताकद असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. स्पर्धेची भव्यता आणि कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील वर्षाच्या पर्वासाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सोसायटीला ₹२५,००० चे प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाईल. पाचव्या पर्वातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला ₹३ लाख रुपयांचे भव्य पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

कोथरूडमधील गल्लीबोळातील आणि सोसायट्यांमधील छुपा अभिनय उजेडात आणणारा हा प्रवास असाच अखंड सुरू राहील, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या सोहळ्याला कोथरूड परिसरातील शेकडो रसिक नागरिक आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.