मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य: ‘रांजेकर ग्रुप’तर्फे संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘कुटुंब कीर्तन’ नाटकाद्वारे ‘मानसी-प्रेरणा फाउंडेशन’ला भरीव निधी सुपूर्द
पुणे : हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू नकोत; त्याऐवजी सामाजिक कार्यासाठी आपले मोलाचे योगदान द्या! राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सर्व स्नेही, आप्तेष्ट आणि कार्यकर्त्यांना केलेल्या या हक्काच्या आवाहनाला यंदा पुणेकरांनी अत्यंत अनोख्या आणि कौतुकास्पद पद्धतीने साद दिली आहे. यंदा या आवाहनाला अधिक व्यापक रूप देत ‘मानसी’ आणि ‘सुखदा’ या समाजोपयोगी उपक्रमांसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या हाकेला माणुसकीच्या नात्याने ‘रांजेकर ग्रुप’ ने भक्कम पाठबळ दिले आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रांजेकर ग्रुप’च्या वतीने प्रशांत दामले प्रस्तुत आणि अष्टपैलू अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘कुटुंब कीर्तन’ या अतिशय बहारदार आणि कौटुंबिक नाट्यप्रयोगाचे कोथरूड येथे खास आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रयोगाच्या माध्यमातून तिकिटांच्या स्वरूपात संकलित होणारा संपूर्ण निधी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘मानसी-प्रेरणा फाउंडेशन’ ला देण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि संवेदनशील संकल्प रांजेकर ग्रुपने केला होता.
हा प्रयोग अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. या प्रयोगाच्या माध्यमातून जमा झालेला निधी ‘मानसी-प्रेरणा फाउंडेशन’कडे सुपूर्द करण्यात आला. समाजाप्रती असलेली ही बांधिलकी पाहून मन खरोखर तृप्त झाले, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा स्तुत्य उपक्रम यशस्वी केल्याबद्दल मी ‘रांजेकर ग्रुप’, प्रिय संकर्षण कऱ्हाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अंतःकरणापासून आभार मानतो. तुम्ही केवळ नाटक सादर केले नाही, तर अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले आहेत. सामाजिक कार्याचा हा पवित्र यज्ञ असाच धगधगत ठेवण्यासाठी रांजेकर समूहाचे असेच मोलाचे सहकार्य आणि प्रेम सदैव पाठीशी राहील, हा सार्थ विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो, असे पाटील यावेळी म्हणाले.