कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश

15

पुणे : प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे, या उद्देशाने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात एका विशेष ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या विविध नागरी समस्या व अडचणी समजून घेतल्या.

या जनसंवाद मोहिमेदरम्यान कोथरूडमधील शेकडो नागरिकांनी पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि इतर प्रशासकीय कामांसंदर्भातील आपल्या तक्रारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, मंत्री पाटील यांनी संबंधित शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट जनता दरबारातूनच दूरध्वनीवरून तत्काळ संपर्क साधला आणि या समस्यांवर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या कडक सूचना दिल्या.

या उपक्रमाविषयी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, जनतेच्या प्रश्नांचे वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक निराकरण व्हावे, यासाठी ‘जनता दरबार’ हे नेहमीच एक प्रभावी माध्यम ठरत आले आहे. नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझ्या सार्वजनिक कार्याचे खरे बळ आहे. कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाच्या समाधानासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी आमदार म्हणून सदैव कटिबद्ध आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.