एरंडवणे येथील स्वप्नशिल्प सोसायटीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून अत्याधुनिक जिम सुविधा; भाजप सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या हस्ते लोकार्पण

7

पुणे : पुण्यातील एरंडवणे परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुदृढ जीवनशैलीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एरंडवणे येथील ‘स्वप्नशिल्प गृहरचना सोसायटी’मधील रहिवाशांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून अत्याधुनिक जिम उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सुसज्ज जिम सुविधेचे अधिकृत लोकार्पण पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजप शहराचे सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

या जिम सुविधेचा शुभारंभ झाल्यानंतर एरंडवणे भागातील नागरिक, तरुण आणि ज्येष्ठ रहिवासी अत्यंत उत्साहाने या सुविधेचा लाभ घेत आहेत. नागरिकांना आपल्या राहत्या परिसरातच आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्जेदार व्यायामाची साधने उपलब्ध व्हावीत आणि त्यांनी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

सोसायटीच्या आवारात ही अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष निधी आणि मोलाचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. या लोकहितकारी आणि आरोग्याभिमुख उपक्रमासाठी स्वप्नशिल्प सोसायटीच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, स्वप्नशिल्प सोसायटीचे अध्यक्ष, कमिटी सदस्य आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.