कोथरूडमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईबाबांची भव्य आरती; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न
पुणे : गुरुपौर्णिमेच्या शुभ आणि मंगलमय मुहूर्तावर कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात विठ्ठलभक्ती आणि साईभक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शास्त्रीनगर येथे ‘श्री साई मित्र मंडळ’ आणि ‘साईज्योत प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबांच्या भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष भक्ती सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून महाआरती करण्याचा बहुमान पटकावला.
याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे पूजा-अर्चा केली आणि महाआरती संपन्न केली. आरतीनंतर त्यांनी संपूर्ण कोथरूड मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.

या पवित्र सोहळ्याला शास्त्रीनगर आणि कोथरूड परिसरातील हजारो साईभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरतीचा लाभ घेतल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. ‘साईबाबांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो,’ अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी साईज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास मोहोळ, कार्याध्यक्ष सचिन पवार, नगरसेविका रुपाली पवार, विश्वास मुरकुटे, वैभव मुरकुटे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.