नशामुक्त युवा’ अभियानात महाराष्ट्र देशात अव्वल; ई-शपथ घेण्यात मिळवला प्रथम क्रमांक, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव
कोल्हापूर : युवा शक्ती ही विकसित भारताच्या निर्मितीची प्रमुख ताकद आहे. व्यसनमुक्त आणि सुदृढ युवा पिढी हीच विकसित भारताची भक्कम पायाभरणी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ या अभियानात महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या अभियानांतर्गत आयोजित ई-शपथ (E-Pledge) ग्रहण उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्यामुळे राज्याने हा बहुमान मिळवला आहे.
हा व्यापक जनसहभाग आणि युवा पिढीचा सक्रिय प्रतिसाद आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानाची कामगिरी असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक, इतर सर्व संबंधित अधिकारी, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, तसेच या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अहोरात्र योगदान देणारे प्रत्येक शिक्षक, कर्मचारी आणि लाडक्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शेवटी आवाहन करताना मंत्री पाटील म्हणाले की, चला, आपण सर्वांनी मिळून व्यसनमुक्त, सक्षम आणि जबाबदार भारत घडविण्याचा संकल्प अधिक दृढ करूया.