पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेतला 700 कोटींचा घोटाळा उघड करा; राऊतांचं सोमय्यांना पत्राद्वारे आव्हान
पिंपरी: भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या संदर्भातील पत्र भाजपचे नेते किरीट सोमय्या जे रोज महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात, त्यांना पाठवलं आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाला असून तो तुम्ही उघड करा, असं आव्हान संजय राऊत यांनी सोमय्या यांना दिलं आहे.
काय म्हटलंय पत्रात?
किरीटजी, घोटाळे उघड करणारा व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची एक ओळख निर्माण केली आहे. त्याला अनुसरूनच तुम्ही सगळीकडे घोटाळे, भ्रष्टाचार उघड करत असता. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे करत आहात. सरकारमधले लोक त्यांच्या सत्तेचा गैरवापर कशाप्रकारे करतात हेदेखील तुम्ही दाखवता. तुम्ही या सगळ्या गोष्टी उघड केल्याने अनेकांना तुरूंगात जावं लागलं आहे मग ते नेते असो किंवा अधिकारी असोत.
आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नुकतंच असं एक भ्रष्ट्राचाराचं प्रकरण माझ्या निदर्शनास आलं आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं ही विनंती मी तुम्हाला करतो आहे. मी मध्यंतरी पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी श्रीमती सुलभा उबाळे आणि इतर काही सदस्यांनी मला काही कागदपत्रं दिली आहेत. त्यावरून असं दिसतं आहे की पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला आहे. आपण हा घोटाळा उघड करावा ही विनंती मी आपणाला पत्राद्वारे करतो आहे.
2018-19 च्या कालावधीत काहीशे कोटींचा गैरव्यवहार या स्मार्ट सिटी प्रकल्पात झाला आहे. त्यावेळी काढण्यात आलेल्या निविदात, त्यावेळी असलेल्या अटी, काही ठराविक कंपन्या जसे की क्रिस्टल इंटिग्रेड प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅरकस या दोन कंपन्यांच्या 500 कोटींपेक्षा जास्त रकमेची टेंडर्स मंजूर करण्यात आली. मात्र आत्ता असं लक्षात येतं आहे की इतका काळ जाऊनही या कंपन्यांनी ज्या कामासाठी हे पैसे घेतले होते ती कामं 50 टक्केही पूर्ण झालेली नाहीत. हा सरकारने दिलेल्या पैशांचा सरळसरळ गैरवापर आहे. या कंपन्यांना टेंडर्स देण्यामागे गैरव्यवहारही आहे असंही दिसतं आहे.
तुमची जी प्रतिमा समाजात तयार झाली आहे त्यानुसार तुम्ही घोटाळे उघड करणारी व्यक्ती आहात. भ्रष्टाचार आणि घोटाळे तुम्हाला मुळीच सहन होत नाहीत. त्यामुळे मी जे पत्रात तुम्हाला लिहिलं आहे त्यासंबंधीचे सगळे पुरावे तुम्हाला एकत्र करून पाठवत आहे. हा घोटाळा म्हणजे फक्त एक सुरूवात असू शकते इतरही अशी प्रकरणं सापडू शकतात जी मी आपणाला निदर्शनास आणून देऊन असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना पत्र पाठवलं आहे आणि पिंपरीच्या स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढा असं आवाहन केलं आहे. आता याबाबत किरीट सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also :