गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

75

पुणे : चतु:शृंगी पोलीस स्थानक व पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर मधील साफा बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकजुटीसह लोकांना मदत होईल, या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनीही सामाजिक भावनेतून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकजुटीसह गरजू लोकांना मदत होईल, या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आपल्या देखाव्यांमधून महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत.

गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तसेच, जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करावे. त्यासोबतच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे. या तिन्ही गोष्टींसाठी मंडळांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

बैठकीस पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सियाजीराव गायकवाड, महापालिका उपायुक्त अविनाश सपकाळ, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दाबकेकर, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.