माझे कोथरूड आणि पुण्याचे सार्वजनिक गणेशोत्सवासोबत अतूट नाते – चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक प्राप्त आहे. त्यातही कोथरुड म्हणजे सांस्कृतिक राजधानीचे माहेर घर. कोथरूड मतदारसंघात मोठा रसिकवर्ग राहतो. या रसिकांमध्ये गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने “प्रथम तुला वंदितो” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कोथरुडकरांना मिळाली असून सर्वच नागरिक मनमुराद आनंद लुटत आहेत.
पुणे शहरात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या काळात कोणतेही गुन्हे घडू नये म्हणून मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, असा आग्रह पुणे पोलिसांनी धरला होता. या अनुषंगाने पुढाकार घेत पाटील यांनी मतदारसंघातील गणेश मंडळांच्या मागणीनुसार, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. याबद्दल मंडळांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार चंद्रकांत पाटील विविध गणेश मंडळे आणि स्थानिक पदाधिकारी नागरिकांच्या घरी आवर्जून भेट देत त्यांना शुभेच्छा देत आहेत. माझे कोथरूड आणि पुण्याचे सार्वजनिक गणेशोत्सवासोबत अतूट नाते आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोथरूड मध्ये अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोथरूडवासियांत असलेला एकोपा आणि उपक्रमशीलता गणेशोत्सवात प्रकर्षाने दिसून येते. श्री गणरायाच्या कृपेने अशा अनेक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे भाग्य मला लाभले. कोथरूडच्या एकोप्याचे हे बंध आणखी वृद्धिंगत होवोत, गणरायाची कृपादृष्टी सदैव माझ्या कोथरूडवासीयांवर राहू देत, ही प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा ! अशा भावना पाटील यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केल्या.