‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ हे केवळ संस्थेचे नाव नसून, प्रत्येक कलाकाराच्या स्वप्नांना आकार देणारी कर्मभूमी ठरेल – नामदार चंद्रकांत पाटील
पुणे : कोथरूड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या, हौशी आणि नवोदित कलाकारांसाठी समर्पित ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ या संस्थेचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कला, संस्कृती आणि रंगभूमीविषयी असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करणारा हा क्षण होता. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते नाट्यतीर्थ फाउंडेशनच्या कलाकारांनी सादर केलेले ‘रंगपूजा’ हे नाटक. रंगमंचावरील कलाकारांची ऊर्जा, संवादांमधून व्यक्त होणारी संवेदनशीलता आणि त्यांच्या अभिनयातील आत्मविश्वास पाहून मन भारावून गेले असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी संबोधित करताना पाटील, माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की, कला आणि कलाकारांना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयाचीही गरज असते. कोथरूडमधील हौशी आणि नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळाली, असे पाटील यांनी म्हटले.
आता या कलाकारांना नाटकाचे तंत्रशुद्ध शिक्षण, मार्गदर्शन आणि अधिक व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’चा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ हे केवळ संस्थेचे नाव नसून, प्रत्येक कलाकाराच्या स्वप्नांना आकार देणारी कर्मभूमी ठरेल, असा मला विश्वास असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.