निवडणूक आयोगाच्या मोहिमेला मंत्री चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा; स्वतःचे ‘SIR मॅपिंग’ केले पूर्ण

7

पुणे : कोथरूड येथे शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचे SIR (Special Intensive Revision) मॅपिंग पूर्ण केले. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या या मोहिमेत पाटील यांनी स्वतः सहभाग नोंदवला.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाटील यांच्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून SIR मॅपिंगची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या उपक्रमामुळे मतदार यादीतील माहिती अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे.

लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. दुबार नावे, चुकीची माहिती किंवा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वेळेत आपले SIR मॅपिंग पूर्ण करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. सर्व मतदार बांधवांनी तातडीने या प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील यावेळी पाटील यांनी केले.

भारत निवडणूक आयोगामार्फत (ECI) राबवली जाणारी SIR (Special Intensive Revision) ही मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठीची एक विशेष मोहीम आहे. मतदार यादीतून मृत, दुबार किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळून यादी पूर्णपणे शुद्ध (Clean) करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. यामध्ये सध्याच्या (२०२५-२६) मतदार यादीतील नावांची पडताळणी २००२ च्या मतदार यादीतील रेकॉर्डशी केली जाते. तुमचे नाव किंवा तुमच्या पालकांचे नाव २००२ च्या यादीत आहे का, हे तपासले जाते. जर तुमची माहिती जुन्या रेकॉर्डशी योग्यरित्या मॅप झाली नाही, तर मतदार यादीतील नावाबाबत शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे. यामुळे बोगस मतदानाला आळा बसतो आणि मतदार यादीतील माहिती अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनते.

Get real time updates directly on you device, subscribe now.