पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासभेच्या तयारीसाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर भाजपाची महाबैठक संपन्न
पुणे : येणाऱ्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन त्याचबरोबर इतर कामांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपा पुणे शहरच्या वतीने नियोजन महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असून सोलापूर विमानतळाचे उद्घाटन यावेळी व्हर्च्युअली होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (एस पी कॉलेज) मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तयारीसाठी पुणे शहरातील पक्षाच्या सर्व आमदारांची, भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महाबैठक महालक्ष्मी लॉन्सला झाली. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमांबद्दल सविस्तर नियोजन करून जबाबदारीचे वाटपही करण्यात आले. दीड हजाराहून अधिक प्रतिनिधी या महाबैठकीसाठी उपस्थित होते. पंतप्रधानांची पुण्यातील सभा ही कायमच उत्साहात, चैतन्यात आणि नव्या ऊर्जेमध्ये होत असते. यावेळीही त्याच पद्धतीने ही सभा घेण्यात येणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधाताई कुलकर्णी, राजस्थानमधील आमदार केसाराम चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीण अध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे- पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते