महिला सक्षमीकरणाच्या या लढ्यात मागे हटणार नाही, महिलांना त्यांचा हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू – मंत्री चंद्रकांत पाटील

9

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी ८:३० वाजता महिला आरक्षणाच्या विषयावर देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, या विधेयकातील दुरुस्ती मंजूर करणे शक्य झाले नाही. मी सर्व माता आणि भगिनींची क्षमा मागतो. देशभरातील माता-भगिनींना समानतेचा अधिकार देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ संदर्भात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदीजींचं हे भाषण दृकश्राव्य माध्यमातून पाहिलं. मोदीजींचा एक-एक शब्द जणू ग्वाही देत होता की, महिलांना सन्मान आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वातलं एनडीए सरकार कटिबद्ध आहे, असे पाटील म्हणाले.

पाटील यांनी पुढे म्हटले कि, लोकसभेत हे महत्त्वपूर्ण विधेयक पारित होऊ न देणाऱ्या काँग्रेससह विरोधकांनी महिलांच्या सन्मानाशी संसदेत, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात खेळ केला. त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. पण, फक्त निषेध करणं पुरेसं नाही. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या या लढ्यात मागे हटणार नाही, महिलांना त्यांचा हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही या निमित्तानं पाटील यांनी दिली.

मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले, माझ्यासाठी राष्ट्रहित हेच सर्वोच्च आहे; तरीही, जेव्हा काही व्यक्तींसाठी पक्षहित हेच सर्वस्व बनते. जेव्हा पक्षहित हे राष्ट्रहितापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते, तेव्हा त्याचे परिणाम शेवटी ‘नारी शक्ती’लाच भोगावे लागतात. काँग्रेस, टीएमसी आणि डीएमके यांसारखे विरोधी पक्ष या ‘भ्रूणहत्ये’साठी दोषी आहेत. त्यांनी या पक्षांना देशाच्या संविधानाचे गुन्हेगार आणि ‘नारी शक्ती’चे अपराधी असल्याचे घोषित केले. त्यांनी असा इशारा दिला की, ज्यांनी देशाच्या निम्म्या लोकसंख्येचे अधिकार हिरावून घेतले आहेत, त्यांना या पापाची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल. आज भारताचा प्रत्येक नागरिक हे पाहत आहे की, भारताच्या ‘नारी शक्ती’ची भरारी कशी रोखली गेली आहे. त्यांची स्वप्ने निर्दयपणे चिरडली गेली आहेत.

मोदी म्हणाले, विरोधकांनी काल जे केले, ते केवळ बाक वाजवणे नव्हते; तो एका स्त्रीच्या सन्मानावर आणि स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला होता. आणि जरी एखादी स्त्री अनेक गोष्टी माफ करू शकत असली, तरी ती आपला अपमान कधीच विसरत नाही. त्यामुळे, संसदेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेल्या वर्तनाची सल प्रत्येक महिलेच्या मनात कायमची घर करून राहील. जेव्हा जेव्हा या देशातील महिलांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघांमध्ये या नेत्यांचा सामना करावा लागेल, तेव्हा त्यांना आठवेल की हे तेच लोक आहेत, ज्यांनी महिला आरक्षण विधेयक रोखले गेल्यावर संसदेत जल्लोष केला होता आणि आनंद साजरा केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.