बारावीचा निकाल जाहीर… परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मनःपूर्वक अभिनंदन
पुणे : आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, बारावी हा शैक्षणिक कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढे वाटचाल सुरू होते. उज्ज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करताना आपल्या कलागुणांचा कल ओळखून आवडत्या शाखेत प्रवेश घ्या. घेतलेल्या शाखेत मन लावून अभ्यास करून प्राविण्य मिळवा. पालकांनीही पाल्याच्या मताचा आदर करून त्याला रुचेल अशा क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी पाठिंबा द्या. पाल्याच्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेतल्याने ते अधिक मेहनत घेऊन यशस्वी होतील, असा ठाम विश्वास वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच त्यांनी पुढे म्हटले की, या परीक्षेत यश प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने, चिकाटीने पुन्हा प्रयत्न करावे, ते नक्कीच यशस्वी होतील यात दुमत नाही, आ विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
यंदाच्या १२ वीच्या परीक्षेत ७ लाख ५६ हजार २२६ मुले बसली होती. त्यापैकी ६ लाख ७६ हजार ९७२ म्हणजे ८९.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ६१ हजार ७४३ होती. त्यापैकी ९४.५८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी झाल्या. मुलांच्या आणि मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात तब्बल ५ टक्क्यांची तफावत असल्याने त्याचा परिणाम एकूण सरासरीवर झाला आहे.