ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन… त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि विचारवंत व्यक्तिमत्त्व गमावले – मंत्री चंद्रकांत पाटील

6

पुणे : मराठी साहित्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ललितलेखनाने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, ‘डोह’ या अजरामर साहित्यकृतीचे निर्माते श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या संवेदनशील, चिंतनशील आणि आशयघन लेखनातून श्रीवींनी मराठी साहित्याला अमूल्य योगदान दिले. त्यांच्या साहित्यकृतींनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि मराठी वाङ्मयाला नवी समृद्धी प्राप्त करून दिली. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि विचारवंत व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास सद्गती देवो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तस्वकीयांना आणि असंख्य वाचकांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

साहित्यविश्वात त्यांची खरी ओळख ललितलेखक म्हणून निर्माण झाली. ‘मनातल्या उन्हात’ हा त्यांचा पहिला ललित लेख १९६० मध्ये ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यांच्या ललित साहित्याचा प्रवास सुरू झाला. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ , ‘पाण्याचे पंख आणि ‘कोरडी भिक्षा’ हे त्यांचे प्रमुख ललितलेख संग्रह ‘मौज’ प्रकाशनाने प्रकाशित केले.

‘डोह’ या संग्रहातून त्यांनी बालपणातील अनुभव, औदुंबरचा निसर्ग, कृष्णा नदी, झाडे, पक्षी आणि गावच्या आठवणी अत्यंत चित्रमय शैलीत शब्दबद्ध केल्या. बालमनातील निरागसता आणि संवेदनशील भावविश्वाचे प्रभावी चित्रण हा या संग्रहाचा गाभा ठरला.

Get real time updates directly on you device, subscribe now.