केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली नियोजित कार्यक्रमस्थळांची प्रत्यक्ष पाहणी; प्रशासकीय यंत्रणेचा घेतला सविस्तर आढावा

6

पुणे : गृहमंत्री अमित शाह यांचे १ ऑगस्ट रोजी पुण्यनगरीत भव्य आगमन होत आहे . त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व नियोजित कार्यक्रमस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्था, बैठक व्यवस्था आणि एकूणच नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे देखील उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १ ऑगस्ट रोजी सकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकास भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुकुंदनगर येथील कटारिया शाळा मैदानावर प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळा संपन्न होणार आहे.

हे दोन्ही नियोजित कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावेत, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही कार्यक्रमस्थळांना प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे रोहित टिळक प्रामुख्याने उपस्थित होते.

या पाहणी दरम्यान व्हीआयपी सुरक्षा, कडक पोलीस बंदोबस्त, भाविक आणि नागरिकांची आसनव्यवस्था, प्रवेश व निकास मार्ग तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांशी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी धीरज घाटे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना व प्रशासनाला आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. दोन्ही कार्यक्रमस्थळांवरील सर्व आवश्यक तयारी आता पूर्ण झाली असून पुणेकर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.