पुण्याचे ‘प्रति पंढरपूर’ विठ्ठलवाडीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले माऊलींचे दर्शन; मिसाळ प्रतिष्ठानच्या खिचडी वाटप उपक्रमातही सहभाग

9

पुणे : आषाढी एकादशीच्या पावन आणि मंगलमय निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन माऊलींचे अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. या पवित्र प्रसंगी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणींच्या चरणी नतमस्तक होऊन राज्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या हजारो वारकरी आणि विठ्ठलभक्तांशी संवाद साधत मंत्री पाटील यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “माऊली विठ्ठल-रुक्मिणींची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनावर सदैव राहो आणि सर्वांचे जीवन सुखी होवो,” अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी माऊलींच्या दर्शनानंतर, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सतीश शेठ धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य साबुदाणा खिचडी वाटप उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी स्वतः उपस्थित भाविकांना आणि वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले.

या भक्तीमय अनुभवाबद्दल आपले भावोद्गार व्यक्त करताना म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही मिसाळ प्रतिष्ठानच्या खिचडी वाटप उपक्रमात सहभागी होत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्याचे भाग्य मला लाभले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोथरूड आणि विठ्ठलवाडी परिसरात भक्ती, सेवा आणि समर्पणाचा हा पवित्र संगम अनुभवताना मन खऱ्या अर्थाने कृतार्थ झाले आहे, असे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.