पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतदार नोंदणी अभियानाचा आढावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे : लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, पुणे येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR – Special Intensive Revision) मोहीम तसेच पुणे पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या आढावा बैठकीदरम्यान मतदार नोंदणीच्या कामाचा वेग आणि सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या सर्व स्तरांतील सहकाऱ्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी ‘एसआयआर’ (SIR) व पदवीधर मतदार नोंदणी अभियानात अत्यंत सक्रियतेने सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांची नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून लोकशाहीच्या या प्रक्रियेत सर्वांना आपले योगदान देता येईल. सर्वांनी आपापल्या भागात मतदार नोंदणीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प यावेळी केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, महापौर मंजुषाताई नागपुरे, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शेखर इनामदार तसेच सर्व आमदार, नगरसेवक आणि पुणे शहरातील भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.