भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक: केंद्र व राज्याच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक’ उत्साहात संपन्न झाली. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री, मंत्री, खासदार, आमदार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सत्रात प्रदेशाध्यक्षांनी संघटन बळकटी, कार्यकर्त्यांची भूमिका आणि आगामी वाटचालीबाबत केलेले मार्गदर्शन निश्चितच दिशादर्शक ठरले. कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणाऱ्या या मार्गदर्शनातून भक्कम संघटना, सक्रिय कार्यकर्ता आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्रात भाजपाची ताकद अधिक मजबूत करण्याचा निर्धार अधोरेखित झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी झटत असताना भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपला जास्तीतजास्त वेळ पक्षकार्याला देत क्रियाशीलता दाखवावी, असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. उद्घाटनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले, भाजपाने राज्यभरात कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या उपलब्धी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने काही वक्ते तयार करता येतील का हे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते खंबीरपणे मागील निवडणुका लढल्याने भाजपाला राज्यभरात घवघवीत यश मिळाले. त्यामुळे राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींपैकी 8 ते 10 हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. एवढी मोठी ताकद आणि क्षमता राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून चालणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पुणे येथे आयोजित भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभरात ‘सेवा-संपर्क अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस, सार्वजनिक जीवनातील त्यांच्या यशस्वी सेवेला पूर्ण झालेली २५ वर्षे, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या भावनेतून मोदीजींनी सदैव गरीब, वंचित आणि गरजू घटकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोविडच्या कठीण काळातही भाजपा कार्यकर्त्यांनी देशभरात व्यापक ‘सेवा यज्ञ’ राबवून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली. याच सेवाभावाची परंपरा पुढे नेत आगामी ‘सेवा-संपर्क अभियानात’ प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ स्तरावर सक्रिय सहभाग नोंदवावा आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. सेवेतून संघटन, संपर्कातून जनविश्वास आणि समर्पणातून राष्ट्रनिर्माण, असेही त्यांनी म्हटले.