मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मोहोळ यांच्या कार्याचे कौतुक करताना पाटील म्हणाले, एखाद्या खेळाडूची खेळाशी संबंधित महत्त्वाच्या आणि मानाच्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणं, हा दुग्धशर्करा योगच. मुरलीधर मोहोळ स्वतः कुस्तीशी संबंधित आहेत. पुण्यात सुरुवात करून त्यांनी नंतर कोल्हापुरात कुस्तीचं औपचारिक शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि अगदी राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीतही सहभाग घेतला. त्यामुळे, स्वतः खेळाडू आणि खेळांची उत्तम जाण असलेल्या मुरलीधरजींची या पदावर झालेली निवड स्वागतार्ह आणि सुखावणारीही आहे.
पाटील पुढे म्हणाले, त्यांच्या नेतृत्वात खेळ आणि खेळाडूंनांही नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास वाटतो. महाराष्ट्राचं नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी आणि पुढील वाटचाल यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा, असे पाटील यांनी म्हटले.
मुरलीधर मोहोळ यांची ही निवड राज्याच्या क्रीडा विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पुण्याचे महापौर आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या बिनविरोध निवडीनंतर क्रीडा विश्वातून मोहोळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडीमुळे आगामी काळात महाराष्ट्रात खेळांच्या पायाभूत सुविधा आणि ऑलिम्पिकमधील राज्याचा सहभाग वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.