‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती; ‘सरहदचा सांगाती’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
पुणे : काश्मीर आणि मणिपूर या संवेदनशील राज्यांशी संवादाचा भक्कम सेतू उभारून राष्ट्रीय एकात्मतेचे मोठे कार्य करणाऱ्या ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. पुणे येथे पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात मंत्री पाटील यांनी संजय नहार आणि सुषमाताई नहार यांचे मनापासून अभिष्टचिंतन करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या मंगलप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘सरहदचा सांगाती’ या विशेष पुस्तकाचे अत्यंत दिमाखात प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी संजय नहार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “माझा आणि संजय नहार यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनचा (ABVP) प्रदीर्घ स्नेह असून तो आजही तितक्याच आत्मीयतेने कायम आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील, विशेषतः काश्मीर आणि मणिपूरमधील तरुणांशी संवादाचा सेतू उभारण्याचे सरहदने केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आहे.”पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, सरहदच्या या राष्ट्रनिर्माणाच्या आणि सामाजिक कार्याने देशाचे केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री माननीय अमितभाई शाह हे देखील अत्यंत प्रभावित झाले आहेत.
सीमावर्ती भागातील आणि देशातील युवकांच्या मनात सकारात्मक विचार रुजवून त्यांना समाजहितासाठी कार्य करण्याची ऊर्जा देणाऱ्या ‘सरहद’ संस्थेच्या या पवित्र कार्याला समाजाचे असेच खंबीर सहकार्य नेहमी मिळत राहील, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, राजीव खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.