ढोल-ताशा पथकांना विमा कवच व अनुदानासाठी कटिबद्ध; मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न मांडणार: मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
पुणे : ढोल-ताशा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आणि सणांची एक अत्यंत समृद्ध परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र व पुणे शहराच्या कार्यकारिणी सदस्यांनी बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील ढोल-ताशा पथकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील ढोल पथकांना अनुदान, विमा कवच तसेच राज्य महोत्सवांमध्ये अधिकाधिक संधी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.
यावेळी ढोल ताशा महासंघ, पुणे शहराच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अक्षय बलकवडे यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी शिरीष थिटे, विलास शिगवण, संजय सातपुते, अभिजीत कुमावत, अमर भालेराव, प्रशांत तांबे, मंदार गोसावी, ओंकार कलढोणकर, प्रणव गंजीवाले, राहुल जाधव व मंदार बलकवडे उपस्थित होते.