बीजमाता’ पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी पाठवलेली पर्यावरणपूरक ‘बियांची राखी’ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मनगटावर; निसर्गाशी बांधिलकी जपण्याचा व्यक्त केला संकल्प
पुणे : ही राखी फक्त भाऊ-बहिणीच्या नात्याचा धागा नाही, तर मातीशी, निसर्गाशी आणि आपल्या समृद्ध परंपरेशी असलेलं नातं जपण्याचा एक पवित्र संकल्प आहे, अशा अत्यंत भावनिक शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातून संपूर्ण देशात पारंपरिक बियाण्यांची क्रांती घडवणाऱ्या ‘बीजमाता’ पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रेमाने पाठवलेली विशेष ‘बियांची राखी’ आज त्यांच्या मनगटावर बांधण्यात आली. ही पर्यावरणपूरक राखी हातात बांधताना मन अक्षरशः भरून आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अत्यंत कलाकुसरीने आणि पारंपरिक गावराण बियाण्यांचा वापर करून ही अनोखी राखी तयार केली आहे. या राखीविषयी कृतज्ञता व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहराच्या अफाट धावपळीत आणि व्यस्ततेतही गावच्या मातीचा सुंध आणि हक्काच्या मायेसारखी ऊब या राखीतून स्पष्टपणे जाणवते. आपल्या पारंपरिक, दुर्मीळ बियाण्यांचे जतन व संवर्धन करून पुढच्या पिढीसाठी निसर्गाचा अमूल्य ठेवा जपण्याचे राहीबाईंचे कार्य संपूर्ण देशासाठी खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आहे.
अशी ही अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण आणि निसर्गाचे रक्षण करणारी जिव्हाळ्याची भेट पाठवल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे मनापासून आभार मानले. तसेच, या रक्षाबंधनाचे औचित्य साधून केवळ कौटुंबिक नात्यांचाच नव्हे, तर निसर्गाशीही आपली बांधिलकी जपण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.