सखी-सुखदा फाउंडेशनच्या रक्षाबंधन सोहळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मोठी ओवाळणी; बालवाडी आणि १६ महिन्यांच्या बाळासाठी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रियेची घोषणा!
पुणे : कोथरूड येथे ‘सखी-सुखदा वेल्फेअर फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष रक्षाबंधन सोहळ्यात कोथरूड परिसरातील अनेक मातांसोबत स्नेहाचा आणि कृतज्ञतेचा बंध अधिक घट्ट झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावून सर्व लाडक्या भगिनींकडून राखी बांधून घेतली. याप्रसंगी वस्ती भागातील अनेक गरजू मातांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे प्रसूती काळात (Pregnancy) महिलांच्या मनावर निर्माण होणारा मानसिक ताण आणि महागड्या उपचारांच्या खर्चावर मात करत, ‘सखी-सुखदा’ उपक्रमाच्या माध्यमातून कोथरूडमधील अनेक गरीब महिलांची बाळंतपणे अतिशय सुरक्षितपणे पार पडली आहेत. याच कृतज्ञतेच्या भावनेतून आज या वस्ती भागातील माता-भगिनींनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपुलकीची राखी बांधली. “भगिनींनी बांधलेली ही राखी हीच आमच्या सामाजिक सेवाकार्याची खरी पावती आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

रक्षाबंधनाला दिली बालवाडी अन् ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रियेची ओवाळणी!
या सोहळ्याचे औचित्य साधून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडकरांसाठी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. वस्ती भागातील लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी नवीन बालवाडी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण ‘ओवाळणी’ त्यांनी यावेळी माता-भगिनींना दिली. तसेच जन्मापासून ऐकू न येणाऱ्या एका निष्पाप १६ महिन्यांच्या चिमुरड्या बाळासाठी अत्यंत महागडी असणारी ‘कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी’ (Cochlear Implant Surgery) पूर्णपणे मोफत करून देण्याची मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रत्येक नागरिकाने समाजात दातृत्वाची भावना जपण्याचे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन केले. या कौटुंबिक आणि भावूक सोहळ्याला सखी-सुखदा वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका, स्थानिक महिला पदाधिकारी, सूर्यप्रभा हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कोथरूड परिसरातील शेकडो माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या संचालिका स्मीता पाटील, सुरेखा जगताप, ॲड. तनिषा पाटील, माजी नगरसेविका छाया मारणे व आकांक्षा कर्णावत यांच्यासह कोथरूडमधील असंख्य माता उपस्थित होत्या.