नरेडको पुणेच्या ‘पुणे अर्बन फॉरेस्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दारूंब्रे येथे वृक्षारोपण; १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नरेडको (NAREDCO) पुणेच्या वतीने ‘पुणे अर्बन फॉरेस्ट इनिशिएटिव्ह’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. उत्तर हिंजवडी परिसरातील दारूंब्रे येथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या पर्यावरण पूरक चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत नरेडको पुणेच्या वतीने परिसरात तब्बल १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे उत्तम संगोपन करून हा परिसर हिरवागार करण्याचा मानस या मोहिमेमागे आहे. वाढत्या शहरीकरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
वृक्षारोपणानंतर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने केवळ वृक्षारोपण न करता, लावलेली झाडे जगवण्याचा म्हणजेच वृक्षसंवर्धनाचा संकल्प करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नरेडको पुणेने सामाजिक जबाबदारीतून सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.