आयआयएसईआर पुणे येथे ‘युवा संगम’ कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग; आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद
पुणे : पुणे येथील आयआयएसईआर (IISER) संस्थेत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रमाच्या विशेष सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या उत्साही युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, युवा संगम’ हा उपक्रम केवळ राज्यांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीपुरता मर्यादित नसून, देशाच्या विविधतेतून एकतेचा अनुभव देणारा आणि युवा पिढीला परस्परांच्या संस्कृती, परंपरा व विकासाची ओळख करून देणारा प्रभावी मंच आहे. यावेळी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जाणून घेण्याचे तसेच दोन्ही राज्यांतील स्नेहबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तरुणांचा उत्साह, त्यांची जिज्ञासा आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठीची त्यांची स्वप्ने पाहून आनंद वाटला असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. या अभिनव उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयआयएसईआर पुणे आणि संपूर्ण आयोजक टीमचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी मंत्री माधुरीताई मिसाळ, IISER पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत, डॉ. विभूती मेरी कच्छप, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.