श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५.९७ कोटींच्या विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ

15

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगर विकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्राचीन, जागृत आणि प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. सुमारे हजार वर्षांहून अधिक इतिहास लाभलेल्या या मंदिराचा उल्लेख विविध पुराणे आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैली, समृद्ध शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचा अद्वितीय संगम असलेले हे मंदिर देश-विदेशातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंजूर केलेला महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला अधिक बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा आणि पर्यटन विकास या सर्व बाबींचा समन्वय साधत हा आराखडा राबविण्यात येत आहे. विकास आणि वारसा संवर्धन यांचा समतोल राखत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे मंदिर परिसराचे वैभव अधिक वृद्धिंगत होणार असून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला ६ मे २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १४४५.९७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या २८ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मूळ मंदिराचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. सध्या मूळ मंदिराच्या संवर्धनासाठी ३२.९६ कोटी रुपये तसेच मंदिरातील विद्युतीकरण, सीसीटीव्ही आणि लाईटिंगविषयक कामांसाठी २३.०५ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. मंदिराचे पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी एकूण २८,०५८ चौरस मीटर जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यापैकी १९,४८९ चौरस मीटर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया अपर मुख्य सचिव (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या बृहद विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर व देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकाने, अँफिथिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टिपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य शासन धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध असून हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. कार्यक्रमास राज्य शासनातील मंत्री, खासदार, आमदार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.