कोथरूडमध्ये १०० हून अधिक नवजात बालकांची मोफत श्रवण तपासणी; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ‘सखी-सुखदा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम
पुणे : प्रत्येक नवजात बाळाच्या आयुष्याची सुरुवात निरोगी व्हावी, प्रत्येक आई-वडिलांच्या मनातील काळजी दूर व्हावी आणि आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या संवेदनशील भावनेतून पुण्यात एक कौतुकास्पद आरोग्य उपक्रम राबवण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आणि ‘सखी-सुखदा फाउंडेशन’ च्या माध्यमातून कोथरूड येथे नवजात व लहान बालकांसाठी मोफत श्रवण तपासणी (Hearing Screening) व तज्ज्ञ मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील जवळपास १०० पेक्षा जास्त बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिरादरम्यान अनेक मातांनी आपल्या लहान बाळांच्या तपासणीचा अहवाल हातात घेतल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. काही पालकांच्या डोळ्यांत आपल्या बाळाच्या निरोगी असण्याचा आनंद पाहून आनंदाश्रू होते, तर ज्या बालकांना काही अडचण जाणवली अशा पालकांना पुढील उपचारांची योग्य तांत्रिक दिशा मिळाली. पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हे समाधान आपल्याला कमालीचे आत्मिक सुख देणारे ठरले, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

या उपक्रमाविषयी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आरोग्यसेवा ही केवळ एक सुविधा नसून तो प्रत्येक कुटुंबाचा अधिकार आहे. समाजातील प्रत्येक बालकाला निरोगी भविष्य मिळावे, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळे आर्थिक अडचण कोणत्याही बाळाच्या उपचारात अडथळा ठरू नये, यासाठी असे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम कोथरूड मतदारसंघात पुढेही सातत्याने राबवत राहू, असे पाटील म्हणाले.
हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सखी-सुखदा फाउंडेशन’च्या संचालिका स्मिता पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन केले. तसेच या शिबिरासाठी आपले मोलाचे तांत्रिक व वैद्यकीय सहकार्य पुरवणाऱ्या ‘संवाद स्पीच, हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशन’च्या संचालिका श्रीमती शिल्पा हुजूरबाजार, प्राजक्ता हुजूरबाजार, यश हुजूरबाजार आणि त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचेही त्यांनी मनापासून आभार मानले.