ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने पुण्यातील एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या असंख्य अनुयायांनी हळहळ व्यक्त केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना मी भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या वैचारिक लेखनातून, सामाजिक चळवळींमधून आणि समाजपरिवर्तनाच्या ध्यासातून त्यांनी संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित केले. युवकांना प्रेरणा देणारे, सामाजिक जाणिवा जागृत करणारे आणि प्रगतिशील विचारांची दिशा दाखवणारे एक दूरदर्शी नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि सप्तर्षी परिवारास तसेच त्यांच्या असंख्य अनुयायांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
डॉ. सप्तर्षी हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर ते एक प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि वक्ते म्हणूनही ओळखले जात होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विचारांशी प्रामाणिक राहून समाजहितासाठी अखंड झटणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी निष्ठेने आवाज उठवला. गांधीवादी विचारसरणीच्या माध्यमातून सामाजिक समता, लोकशाही मूल्ये आणि मानवी संवेदनांचा आग्रह त्यांनी सातत्याने जपला.