पत्रकार संतोष गाजरे लिखित ‘महाराष्ट्र सेवक राष्ट्र सेवक – देवाभाऊ’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : महाराष्ट्राचे लाडके नेते आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रेरणादायी प्रवास, त्यांची कार्यपद्धती आणि कणखर नेतृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र सेवक राष्ट्र सेवक – देवाभाऊ’ या विशेष पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा पुणे येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ पत्रकार संतोष गाजरे लिखित आणि ईश्वरी प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून पुस्तकाचे विमोचन केले.
या सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अद्वितीय प्रशासकीय कौशल्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रामुख्याने गौरव केला. पुस्तकातील प्रसंगांचा उल्लेख करत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक अत्यंत विकासाभिमुख, विश्वासार्ह आणि सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांचे वेळेचे प्रभावी नियोजन, कोणत्याही विषयावरील अथांग अभ्यासू वृत्ती, दूरदृष्टी, सक्षम नेतृत्व आणि कुशल प्रशासकीय शैली हे गुण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आदर्शवत आहेत. त्यांच्या याच गुणांमुळे आज महाराष्ट्र विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचला आहे.
पाटील यांनी पुढे नमूद केले की, लेखक संतोष गाजरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीचा अत्यंत अभ्यासपूर्ण वेध घेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. हे पुस्तक केवळ राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि अभ्यासकांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी निश्चितच अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, देवेंद्रजींचे काका बाळासाहेब फडणवीस, प्रसेनजित फडणवीस, प्रा. विशाल गरड, ईश्वरी प्रकाशनचे संतोष दायभर, संदीप कद्रे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.