मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याला मोठे यश… राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (NBT) क्षेत्रीय कार्यालय बाणेर येथे उभारणार

7

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (National Book Trust – NBT) क्षेत्रीय कार्यालय पुण्यातील बाणेर येथे उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू झाल्यानंतर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी, संशोधक, लेखक, प्रकाशक आणि वाचनप्रेमींना विविध साहित्य, पुस्तक प्रदर्शन, वाचन संस्कृती संवर्धन उपक्रम तसेच शैक्षणिक कार्यक्रमांचा मोठा लाभ होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असून, पुस्तक संस्कृतीला चालना मिळणार आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ज्ञान, शिक्षण आणि वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असणारे हे भव्य कार्यालय म्हणजे वाचनसंस्कृतीला मिळालेली एक नवी ऊर्जा आहे, जी कोथरुडची शान आणखी वाढवेल,अशी भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली

यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे कर्नल युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.